माझा नुकताच डॉ. आ. ह. साळुंखे या विख्यात विचारवंत, विद्वान, आणि साहित्यिकांच्या लिखाणाशी परिचय झाला— श्री राजू परुळेकरांनी घेतलेल्या त्यांच्या एका मुलाखतीद्वारे. ही मुलाखत YouTube वर उपलब्ध आहे - link.
(राजू परुळेकरांच्या कामाबद्दल विशेष कृतज्ञता- Thank you!)मी संस्कृतमध्ये MA करत असताना संस्कृतच्या जगात किती जातिवाद आहे हे माझ्या लक्षात आले. काही शिक्षक आणि विद्यार्थी बहुजनांना, विशेषतः दलितांना, सरसकट कमी लेखायचे. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेली हीन भावना ते अगदी सहज आणि निःसंकोचपणे व्यक्त करायचे. हे सगळं बघून मला इतका मोठा धक्का बसला की, “सुरू केले आहे तर संपवले पाहिजे,” या भावनेने मी MA पूर्ण केले खरे; पण माझा संस्कृतमधला रस मात्र संपूर्णपणे निघून गेला होता.
लवकरात लवकर संस्कृतपासून दूर कसे जाता येईल, यासाठी मी धडपडू लागले.
त्यानंतर मी फ्रेंच भाषेवर माझे सगळे लक्ष केंद्रित केले. काही काळ मुंबईमध्ये फ्रेंच शिकवत होते. पुढे मी शिक्षण (Education) या विषयात PhD पदवी मिळवली. त्यावर काम करत असताना अमेरिकेमध्ये teaching assistantship अंतर्गत होतकरू शिक्षकांना (B.Ed.च्या विद्यार्थ्यांना) ‘बहुसांस्कृतिक शिक्षण’ (Multicultural Education) हा विषय शिकवू लागले.
पुढे DEI (Diversity, Equity, and Inclusion)—म्हणजे विविधता, समता आणि समावेशकता—या क्षेत्रात एका अमेरिकी नॉन-प्रॉफिट संस्थेत काम केले. या सगळ्या प्रवासात ‘Social Justice’ (सामाजिक न्याय) हा विषय माझ्या मनाला भिडत गेला आणि आता तर मला दुसरे काही सुचतच नाही.
मी श्रीमंत घरात जन्मले नाही. पण मध्यमवर्गीय, विशेषाधिकार (privilege) लाभलेल्या ब्राह्मण कुटुंबात जन्मल्यामुळे मला शोषण ह्या विषयावर आयुष्यभर शिकत राहावे लागेल. कारण मी काही गोष्टी कधीच अनुभवू शकणार नाही. माझ्या identity मुळे, माझ्या नकळत, माझ्या मनात अजूनही काही पूर्वग्रह असू शकतात—ज्यांचा सतत विचार करून स्वतःमध्ये बदल घडवण्याचा मी प्रयत्न करत राहीन.
आजवर माझा जन्म ज्या जातीत झाला, त्यामुळे मला अनेक गोष्टी सहजपणे मिळत आल्या आहेत, ज्या इतर जातींच्या लोकांना खूप कष्ट करूनसुद्धा अनेकदा मिळत नाहीत. ज्या समाजव्यवस्थेमुळे हे शक्य झाले, ती समाजव्यवस्था आमूलाग्र बदलण्याच्या कामात माझा इवलासा का होईना, पण हातभार लावण्याची माझी इच्छा आहे.
गेल्या दीड दशकात संस्कृतपासून दुरावल्यामुळे संस्कृतसंबंधित माझे जवळजवळ काहीच वाचन झाले नाही. जातीवादी, मनुवादी लोकांच्या scholarship किंवा विद्वत्तेमध्ये मला काडीमात्रही रस नाही. त्यामुळे साहजिकच, जेव्हा मला कळले की डॉ. साळुंखे यांच्यासारखे विद्वान या जगात आहेत आणि त्यांच्या लिखाणाचा एवढा मोठा खजिना उपलब्ध आहे, तेव्हा मला कधी एकदा त्यांची पुस्तके वाचायला सुरु करते असे झाले.
याआधी असेच मला डॉ. रूपा कुलकर्णी यांच्याबद्दल कळले होते. त्या नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या माजी विभागप्रमुख असून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यांच्या मुलाखती मी YouTube वर पाहिल्या होत्या; पण त्यांची पुस्तके अजून वाचलेली नाहीत. तीही लवकरच मिळवण्याचा प्रयत्न करीन.
डॉ. साळुंखे यांचा चार्वाकावर गहिरा अभ्यास आहे, प्रभुत्व आहे. खरे तर त्यांना ललित लेखक व्हायचे होते. पण संस्कृत साहित्याचा अभ्यास करताना हे ज्ञान बहुजनांना उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी ललित लेखन सोडून वैचारिक लेखन करण्यास सुरुवात केली. (ही माहिती परुळेकरांच्या वीडियो मधून मिळाली)
त्यांची काही पुस्तके—उदा. ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’—ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. हे पुस्तक घेऊन मी सध्या वाचत आहे. पण त्यांची इतर पुस्तके—‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘विद्रोही तुकाराम’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध’ इत्यादी—फक्त कागदी स्वरूपात मिळू शकतात.
ही पुस्तके शोधत असताना माझ्या वडलांची विदर्भातील एका पुस्तकविक्रेत्याशी ओळख झाली. माझ्या बाबांनी अलीकडेच या विक्रेत्याकडून ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ची कागदी प्रत विकत घेतली होती. त्यांनी त्या विक्रेत्याला डॉ. साळुंखे यांच्या इतर पुस्तकांबद्दल विचारले आणि सांगितले, “माझ्या मुलीला वाचायची आहेत.”
त्यावर ते म्हणाले, “अरे वा, वाह! किती छान. मी तुम्हाला लगेचच यादी पाठवतो.”
आणि चक्क अर्ध्या तासात त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या साळुंखे यांच्या सगळ्या पुस्तकांची शीर्षके आणि किमतींची एक हस्तलिखित यादी तयार करून पाठवली. मी परदेशात राहत असल्यामुळे मला हवी असलेली सात पुस्तके पोस्टाने पाठवण्याचा किती खर्च येईल, हेही त्यांनी काही तासांत कळवले.
मी त्यांना WhatsApp वर मेसेज पाठवला आणि म्हटले, “तुम्ही हे जे काम करता ते खूप महत्त्वाचे आणि चांगले आहे. त्याबद्दल thank you!”
त्यावर ते म्हणाले—
“थँक्यू दीदी, मी फक्त फुले-शाहू-बाबासाहेब यांची पुस्तकं विक्री करतो.”
हे ऐकून मला भरून आले. त्यांचे खूप कौतुक वाटले.
मुळातच पुस्तकविक्री हा फार पैशाचा धंदा नसावा. त्यातही नैतिक मूल्यांवर ठाम राहून फक्त फुले-शाहू-बाबासाहेबांची पुस्तके विकायचे ठरवले, तर बहुधा विक्री आणखी कमी होत असावी. तरीही पैशासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता हे काम चालू ठेवणे खरंच कौतुकास्पद आहे.
मी त्यांना म्हटले, “मला नुकतेच डॉ. साळुंखे यांच्याबद्दल कळले आणि कधी एकदा त्यांची पुस्तके वाचायला सुरु करते असे झाले. मला जसे—उशिरा का होईना—त्यांच्याबद्दल कळले, तसेच अजून लोकांना त्यांच्याबद्दल कळावे, त्यांनी त्यांची पुस्तके तुमच्याकडून विकत घ्यावीत आणि वाचावीत, अशी माझी इच्छा आहे.”
सध्या भारतातून आणि जगभरातून वाईट, भयानक, चिंताजनक बातम्याच आपल्या कानावर पडतात. Instagram वर कुत्र्या-मांजरांचे videos सोडले, तर मन प्रसन्न होईल असे फारसे काही दिसत नाही. कोणाशी बोलायला गेले तर अंधभक्त भेटतात आणि अजून निराशा वाटू लागते.
अशा परिस्थितीत या पुस्तकविक्रेत्यासारखी एखादी व्यक्ती भेटली की खूप आनंद होतो. आणि समाजात चांगला बदल होऊ शकतो, अशी आशा बाळगण्याचे पुन्हा एकदा धाडस मिळते.
या छोट्याशा संवादाने मला नवीन उमेद मिळाली. तशीच उमेद तुम्हालाही मिळो, ही सदिच्छा! ❤️
आणि जर तुम्हाला डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेली पुस्तके—किंवा फुले-शाहू-बाबासाहेबांवरील पुस्तके—वाचायची असतील, तर मला कळवा. मी तुमची भेट या पुस्तकविक्रेत्याशी करून देईन.
(माझे संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. माझे बहुतांश वाचनही इंग्रजीतच झाले आहे. मराठीत पहिल्यांदाच इतके लिहिले आहे. त्यामुळे काही चुका असतील तर प्लीज माफ करा! 🙏)
